भारत आणि इराण (पर्शिया ): अकरावी इतिहास स्वाध्याय

धडा: ७ भारत आणि इराण (पर्शिया): Bharat aani iran (parshiya)

प्र.१ (अ) योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

१. इतिहासलेखनाचा जनक…….यांना मानते जाते

(अ) हिरोडोटस

ब)अलेक्झांडर

क) स्कायलॅक्स

ड) दार्युश

उत्तर: हिरोडोटस

२. सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस तक्षशिला येथे…. नावाचा राजा राज्य करत होता.

(अ) चंद्रगुप्त

(ब) आंभी

(क) पुरू

(ड) शशीगुप्त

उत्तर: आंभी

(ब) “ब” गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

“अ” गट “ब” गट

१. पर्सेपोलिस – पहिला दार्युश याने वसवलेले शहर

उत्तर: बरोबर जोडी आहे.

2. हेलिकारनॅसस– या नगरराज्यात हिरोडोटसचा जन्म झाला

उत्तर: बरोबर जोडी आहे.

3. तक्षशिला – विद्येचे व शिक्षणाचे केंद्र

उत्तर: बरोबर जोडी आहे.

4. निसा – पर्शियन वसाहत – ही चूक जोडी आहे.

उत्तर: निसा- ग्रीक वसाहत

(क) नावे लिहा.

१. अखमोनीय साम्राज्याचा शेवटचा सम्राट

उत्तर: तिसरा दार्युश

२. पहिल्या दार्युशने पाडलेल्या नाण्यांची नावे

उत्तर: “दारिक” सोन्याची आणि “सिग्लॉस” चांदीची नाणी.

प्र.२ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

१. सम्राट सिकंदराने पर्शियावर स्वारी केली.

उत्तर : ग्रीक  आणि आखमोनीय यांच्यात दीर्घ काळ चाललेल्या संघर्षामध्ये अखमोनीय सत्ता दुर्बल होत गेली. ग्रीक आणि अखमोनीय संघर्षाचे दूरगामी परिणाम राजकीय आणि आर्थिक क्षेत्रावर होणे अपरिहार्य  होते. याचा फायदा घेऊन  मॅसिडोनियाचा राजा तिसरा अलेक्झांडर म्हणजेच महान जगजेता म्हणून उपाधी मिळालेला सम्राट सिकंदर याने पर्शियावर स्वारी केली. 

२. सिकंदराच्या स्वारीचे भारताच्या राजकीय पटावर फारसे दूरगामी परिणाम झाले नाहीत.

उत्तर: सिकंदराच्या स्वारीचे भारताच्या राजकीय पटावर फारसे दूरगामी परिणाम झाले नाहीत. कारण सिकंदराने भारतावर  स्वारी केली.  परंतु  तो  जिंकलेल्या  प्रदेशांवर  जास्त काळ  सत्ता  प्रस्थापित करू शकला नाही.  त्याच्या मृत्यूनंतर थोड्याच काळात चंद्रगुप्त मौर्याने बिहार ते अफगाणिस्तान अशा विशाल भूप्रदेशावर मगधाचे साम्राज्य प्रस्थापित केले आणि भारताच्या इतिहासाला वेगळे वळण लागले.

प्र.३ तुमचे मत नोंदवा.

१.हीरोडोटसला इतिहासलेखनाचा जनक मानला जाते.

उत्तर: हीरोडोटसला इतिहासलेखनाचा जनक मानला जाते. कारण ग्रीक नगरराज्ये आणि अखमोनीय साम्राज्य यांच्यात इसवी सनापूर्वी ५०० ते ४४९ या काळात झालेल्या लढाया आणि युद्धांमागील कारणपरंपरेचा वेध घेणे हा प्रमुख उद्देश मनाशी धरून त्याने लेखनास सुरुवात केली. त्यातून जो ग्रंथ सिद्ध झाला, त्या ग्रंथाचे ग्रीक नाव ‘हिस्टोरिया’ (द हिस्टरीज) असे आहे. ग्रंथाच्या सुरुवातीलाच त्याने म्हटले आहे, “मी, हेलिकारनॅससचा हिरोडोटस इथे माझ्या शोधातून मिळालेली माहिती सादर करत आहे. हेतू हा की काळाच्या ओघात मानवी कामगिरी विस्मरणाच्या पडद्याआड जाऊ नये आणि महान व नवल करावे अशा कृती- ग्रीकांच्या असोत की बर्बर (पर्शियन) लोकांच्या- त्यांचा गौरव उणावला जाऊ नये.”

एखाद्या विशिष्ट प्रश्नाचा वेध घेण्यासाठी माहिती जमवून त्या माहितीची कालक्रमानुसार मांडणी करण्यावर भर देणारा, हिरोडोटस हा पहिलाच इतिहासकार होता. हे करत असताना त्याने देव, मनुष्याचे नशीब यांसारख्या गोष्टींचा उपयोग केला नाही. नंतरच्या काळात कालक्रमानुसार घटनांची मांडणी करणे हे इतिहासलेखनाचे आवश्यक सूत्र बनले. इतिहासलेखनाला एका स्वतंत्र ज्ञानशाखेचे स्वरूप प्राप्त होण्याच्या प्रक्रियेत हे सूत्र पायाभूत ठरले म्हणून हिरोडोटसला इतिहासलेखनाचा जनक मानले जाते.

२. प्राचीन काळी तक्षशिला हे विद्येचे व शिक्षणाचे केंद्र होते.

उत्तर: तक्षशिला हे “लोकांनी गजबजलेले, समृद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासनव्यवस्था असलेले एक नगर” होते. प्राचीन तक्षशिला नगरासंबंधीची माहिती बौ‌द्य साहित्य आणि ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून मिळते. तेथे अनेक विद्वान राहत होते. त्यांची कीर्ती ऐकून भारतीय उपखंडाच्या विविध प्रदेशांमधून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असत. त्यामुळे तक्षशिला हे विद्येचे आणि शिक्षणाचे केंद्र बनले होते. तक्षशिला येथे शिकवल्या जाणाऱ्या विषयांमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, वेदागे, प्राचीन परंपरा आणि नीतिशास्त्र, तत्त्वज्ञान, गणित, संगीत, वैद्यक, पुराण, इतिहास, अस्त्रविदया, काव्य यांसारख्या अनेक विषयांचा समावेश होता.

प्र.4. सविस्तर उत्तरे लिहा.

१. पर्शियन सत्तेचे भारतावरील राजकीय व सांस्कृतिक परिणाम स्पष्ट करा.

उत्तर: १) भारतीय उपखंडातील पर्शियन सत्तेचे वर्चस्व किमान दोन शतके तरी अस्तित्वात होते. साम्राज्याच्या प्रशासनासाठी प्रत्येक जिंकलेल्या प्रांतावर सत्रपांची म्हणजे राज्यपालांची नेमणूक करण्याची पद्धत होती. ही पद्धत पुढे सिकंदर, शक आणि कुशाण राज्यकर्त्यांनीही राबवली.

२)अखमोनीय साम्राज्याच्या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात अरेमाइक लिपी वापरात आली. याच लीपीतून पुढे खरोष्ठी ही प्राचीन भारतीय लीपी विकसित झाली. सम्राट अशोकाचे या प्रदेशातील लेख खरोष्ठी लीपीत कोरलेले आहेत. राजाज्ञा असलेले देश कोरीव लेख मोक्याच्या जागी प्रदर्शित करण्याची पद्धतही अखमोनीय सम्राटांच्या लेखांच्या उदाहरणावरून घेतलेली होती असे दिसते. 

३) पहिला दार्युश याने सिंधू नदी आणि अरबी समुद्राची माहिती मिळवण्यासाठी अनेक शोधक पाठवले होते. त्यामध्ये ‘स्कायलॅक्स ऑफ कार्यदा ” या  नावाने ओळखला जाणारा आयोनियाचा ग्रीक खलाशी होता. तो भारतापर्यंत पोचणारा पहिला  आयोनियन ग्रीक होता. स्कायलॅक्सने सिंधू नदीपासून  सुरुवात करून अरबी समुद्राच्या किनाऱ्याला वळसा घालत तांबड्या समुद्रात प्रवेश केला आणि तो नाईल नदीच्या मुखापाशी ‘सुएझ’ येथे पोचला. 

४) स्कायलॅक्सच्या प्रवासाचा वृत्तान्त ‘पेरिप्लस ऑफ स्कायलॅक्स’ या नावाने प्रसिद्ध होता. थोड्याच अवधीमध्ये पहिल्या दार्युशने सिंधू नदीच्या खोऱ्याच्या खालच्या पट्ट्यातील प्रदेश जिंकून घेतला.स्कायलॅक्स सुएझ येथे पोचला तेव्हा इजिप्तच्या फैरोने खणलेला नाईल आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा एक कालवा अस्तित्वात होता. दार्युशने तो पुन्हा खोदवला. त्यामुळे पर्शिया आणि भारतीय उपखंडातील दळणवळणासाठी एक सागरी मार्ग नव्याने खुला झाला.

५) या समुद्री मार्गामुळे अखमोनीय साम्राज्यात समाविष्ट असलेल्या भारतीय उपखंडातील वायव्य प्रदेश आणि सिंघ-पंजाबच्या प्रदेशातील व्यापाराला उर्जितावस्था आली. पर्शियातील बाजारांमध्ये भारतातून येणाऱ्या हस्तिदंत आणि सागवानी लाकूड या गोष्टींना मोठ्या प्रमाणात मागणी होती .सुसा येथील दार्युगच्या  लेखात भारतीय हस्तिदंत आणि सागवानी लाकड वापरून राजवाड्याच्या बांधकामासाठी केल्याचे नमूद आहे.

६) इसवी सनापूर्वी ४८० मध्ये सम्राट झरेक्सेसने ग्रीकांवर आक्रमण केले तेव्हा त्याच्या सैन्यात गांधार, सिंघ आणि पंजाब येथील सैनिक होते. गांधारामधील सैनिकांजवळ बेताचे धनुष्य आणि आखूड दांड्याचे भाले होते. त्यांच्याजवळ घोडे तसेच घोडे जोडलेले रथही होते. भारतीय सैनिकांचा पोशाख सुती कापडाचा असून त्यांच्याजवळ बेतापासून बनवलेले धनुष्य आणि बाण होते. त्यांच्या बाणांची अग्रे लोखंडी होती. धनुष्यबाण चालवण्यात ते अत्यंत निपुण होते. 

७) अखमोनीय साम्राज्याचा संस्थापक दुसरा सायरस सत्तेवर येण्यापूर्वी पर्शियामध्ये चलनी नाणी वापरात नव्हती. मोठ्या प्रमाणावर वस्तुविनिमय प्रचलित होता. काही प्रसंगी वस्तूंचा मोबदला म्हणून ठरावीक वजनाच्या चांदीच्या लडींचा वापर केला जाई. सायरसने जिंकून घेतलेल्या लिडिबा या ग्रीक राज्यामध्ये चलनी नाणी प्रचारात होती. त्याता ‘स्टेटर’ असे म्हणत असत. सायरसने लिडिबाच्या धर्तीवर नाणी पाडण्यास सुरुवात केली.

८) पाहिल्या दार्युशने स्वतःची प्रतिमा असलेली ‘दारिक” ही सोन्याची आणि “पर्शियन सिग्लास” चांदीची नाणी पाडायला सुरुवात केली. सम्राट सावरसने त्याच्या अधिपत्याखालील आशिया मायनरमधील ग्रीक वसाहतींमधून स्वपती आणि शिल्पी आणवले होते.

९) सिकंदराने पर्शियावर विजय मिळवल्यानंतर पर्सिपोलिस उद्‌ध्वस्त केले. पर्शियन साम्राज्य संपुष्टात आले. पर्शियन सम्राटांसाठी काम करणाऱ्या स्वपती आणि कारागिरांचा राजाश्रय संपला. स्थलांतर करत ते भारतात पोचले. सम्राट अशोकाच्या दरबारात त्यांना राजाश्रय मिळाला, सम्राट अशोकाने उभ्या केलेल्या दगडी स्तंभांमध्ये त्या कारागिरांच्या शैलीचा प्रभाव दिसतो. अशा रीतीने भारतातील दगडी कोरीव कामाच्या कलेचा उगम पर्शियन आणि पर्यायाने ग्रीक शिल्पशैलीमध्ये दाखवता येतो.

२. सिकंदराच्या स्वारीचे वर्णन करा.

उत्तर: १) सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस अखमोनीय साम्राज्याची सिंघ, पंजाब आणि अफगाणिस्तान या प्रदेशांवरील सत्ता कमकुवत झाल्यामुळे तिथे छोटी छोटी राज्ये उदयाला आली होती. त्यांच्या आपापसातील संघर्षामुळे सिकंदराच्या विरोधात त्यांची एकसंघ फळी उभी राहिली नाही.

२)सिकंदर इसवी सनापूर्वी ३३४ मध्ये मॅसिडोनियाचा राजा झाला. इसवी सनापूर्वी ३३१ मध्ये अखमोनीय सम्राट तिसरा दार्युश याचा त्याने पराभव केला.  त्यानंतर त्याने इराण आणि काबूलकडे मोर्चा वळवला. काबूलच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतल्यानंतर तो हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याच्या प्रदेशात आला. 

३)नाइकिया इथे सिकंदर आणि तक्षशिलेचा राजा आंभी यांची भेट झाली. आंभीने सिकंदराचे स्वागत करून त्याच्याशी हातमिळवणी केली. शिसिकोटम (शशीगुप्त) नावाचा दुसरा एक राजा सिकंदराला स्वत: हुन शरण आला, परंतु सर्वच भारतीय राज्यांनी सहजपणे शरणागती स्वीकारली नाही. काहींनी सिकंदराशी निकराचा सामना केला.

४) झेलम नदीच्या तीरावर सिकंदर आणि राजा पुरु (पोरस) यांच्यामध्ये  लढाई झाली, या लढाईत पुरुचा पराभव झाला तरी त्याच्या पराक्रमाने सिकंदर आणि त्याचे सैन्य अत्यंत प्रभावित झाले. पुरुच्या सैन्यातील हत्तींचा वापर हा ग्रीकांसाठी नवीन होता. हत्तींची फळी फोडणे हे त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान ठरले.

५) त्यापुढील वाटेत सिकंदर निसा नावाच्या एका ग्रीक वसाहतीपाशी पोचला. निसाच्या लोकांनी सुरुवातीला सिकंदराला विरोध केला तरी नंतर त्यांनी त्याचे स्वागत केले.

६) त्यानंतर सिकंदर चिनाब आणि रावी नद्‌यांच्या दिशेने पुढे जात राहिला. तेथील राज्यांवर विजय मिळवत सिकंदर बियास नदीपर्यंत पोचला. तिथे पोचेपर्यंत सिकंदराच्या सैनिकांची उमेद संपत आली होती. त्यांनी पुढे जाण्यास नकार दिला. सिकंदराला परत जाणे भाग पडले.

७) परतण्यापूर्वी सिकंदराने पुरुकडे पंजाबमधील प्रदेशांचे आणि आंभीकडे सिंधमधील प्रदेशांचे आधिपत्य सोपवले. वारणावतीचा राजा अभिसार याच्या हाती त्याने काश्मीरचे राज्य सोपवले. परतीच्या वाटेवर त्याने शिबी, मल्ल इत्यादी राज्यांचा पाडाव केला. इतर प्रदेशांमध्ये त्याने ग्रीक सत्रपांची नेमणूक केली. ग्रीसकडे परतत असताना इसवी सनापूर्वी ३२५ मध्ये त्याचा बॅबिलोन इथे मृत्यू झाला.

उपक्रम

आंतरजालाच्या सहाय्याने पर्शिपोलिस येथील राजवाडा आणि सुरसा येथील अपादन यांची अधिक माहिती संग्रहित करा.

Leave a Comment